नवी दिल्ली : दक्षिण-पूर्व आशियामध्ये आलेल्या सेन्यार उष्णकटिबंधीय चक्रीवादळामुळे विक्रमी पाऊस झाला असून, या महाभीषण नैसर्गिक आपत्तीने संपूर्ण प्रदेशाला हादरवून सोडले आहे. विशेषतः इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर हाहाकार माजला आहे, जिथे ३००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. थायलंड आणि मलेशियातही लाखो लोक विस्थापित झाले असून, या दशकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती म्हणून याकडे पाहिले जात आहे.
यावर्षी मान्सूनच्या काळात उष्णकटिबंधीय वादळांमुळे झालेल्या अतिवृष्टीने गेल्या अनेक दशकांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या पुराचा सर्वात मोठा फटका इंडोनेशियाला बसला आहे. इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर परिस्थिती अत्यंत गंभीर असून, मृतांचा अधिकृत आकडा ३०० हून अधिक झाला आहे. अजूनही अनेक लोक बेपत्ता असल्याने हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. आपत्कालीन संस्थेचे प्रमुख सुहार्यंतो यांच्या माहितीनुसार, किमान २७९ लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
महत्त्वाचे रस्ते तुटले, दळणवळण विस्कळीत
सेन्यार चक्रीवादळामुळे आलेल्या महापुरात हजारो घरे वाहून गेली असून, इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. सुमात्रा बेटावरील आचेह प्रांतात राहणार्या अरिनी अमालिया यांनी बीबीसी न्यूजला सांगितले की, ङ्गङ्घपाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की, काही सेकंदांतच तो रस्त्यांवरून घरांमध्ये घुसला. बघता बघता घर पाण्याखाली गेले.फफ
या बेटाच्या उत्तर भागात पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे मुख्य रस्ते तुटले आहेत. वीज आणि इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने बचावकार्यात मोठे अडथळे येत आहेत. प्रशासनाने तातडीने ८० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले असून, अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.
थायलंड आणि मलेशियातही मोठे नुकसान
या चक्रीवादळाचा परिणाम केवळ इंडोनेशियापुरता मर्यादित राहिलेला नाही. शेजारील थायलंडमध्ये शनिवारीपर्यंत १६० हून अधिक मृत्यूची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मलेशियातही अनेक लोकांच्या मृत्यूची बातमी आहे. लाखो लोक या नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित झाले असून, त्यांना तात्पुरत्या निवारागृहांमध्ये हलवण्यात आले आहे. दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये सेन्यार चक्रीवादळामुळे झालेला विनाश पाहता, आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.